स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘इंडिया’आघाडीच्या बैठकीला? राजू शेट्टींनी दिलं उत्तर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अद्याप इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलं आहे. मागील काही दिवसांपासून भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचं काम विरोधकांकडून सुरु आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ असं नावंही देण्यात आलं असून भाजपला पराभूत करण्यासाठी इतरही संघटनांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून प्राधान्य देण्यात येत आहे, अशातच आता राजू शेट्टींनी (Raju Shetti) यांनी आपण इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण आले होते. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून झालेला नाही. एप्रिल 2021 मध्ये महाविकास आघाडीसोबतचे संबंध तोडल्यानंतर नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधेलेला नव्हता. किमान महाविकास आघाडी का सोडली हे तरी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचारायला हवे होते? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केला आहे.

महाविकास आघाडीसोबत युती तुटल्यानंतर मविआच्या नेत्यांशी आमचा कुठलाही संपर्क झाला नाही. महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्ष इंडिया आघाडीत गेले आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तसा निर्णय घेतलेला नाही. देशभरातील सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येवून एमएसपी गँरटी मोर्चा स्थापन केलेला आहे, एमएसपी गॅंरंटी मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामिल असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. जो काही निर्णय होईल तो 27 राज्यातील शेतकरी संघटना घेतील, त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, उद्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक पार पडणार आहे. देशभरातील भाजपविरोधी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. बैठकीत भाजपला पराभूत करण्याची रणनीती आखली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. अशातच आता भाजपविरोधातील इतर संघटनांना इंडिया सोबत घेणार का? निवडणुकीआधी स्वाभिमान शेतकरी इंडियासोबत जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *