बांगलादेश-अफगाणिस्तान बिघडू शकतात अनेक संघांचा गेम प्लॅन, असा आहे विक्रम

बांगलादेश आणि अफगाणिस्तान (Bangladesh-Afghanistan) हे संघ अनुक्रमे 1986 आणि 2014 पासून आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) सहभागी होत आहेत. जरी दोन्ही संघांना आशिया चषक जिंकता आलेला नसला तरी या स्पर्धेत त्यांनी मोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. बांगलादेशने आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांना पराभूत केले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाने बांगलादेश आणि श्रीलंकेचाही पराभव केला आहे.

2012 च्या आशिया कपमध्ये बांगलादेशने मीरपूरच्या मैदानावर भारताचा 5 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 290 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशने हे लक्ष्य 49.2 षटकांत पार केले. त्याचवेळी 2018 च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचा बांगलादेश संघाकडून पराभव झाला होता. त्या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करताना 239 धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानचा संघ लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला आणि 50 षटकांत केवळ 200 धावाच करू शकला होता.

अफगाणिस्ताननेही केलेत मोठे उलटफेर
अफगाणिस्तानने पहिल्यांदा 2014 आशिया कपमध्ये भाग घेतला होता. त्या पदार्पणाच्या मोसमातच त्यांनी बांगलादेशचा पराभव केला होता. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 254 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 222 धावांत गडगडला. यानंतर आशिया कप 2018 मध्ये अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला होता. त्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 256 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात विरोधी संघ 119 धावांवर गारद झाला होता.

बांगलादेशने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 2 वेळा (2012 आणि 2018) आशिया कपचा अंतिम सामना खेळला आहे. मात्र अफगाणिस्तानचा संघ एकदाही अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. बांगलादेशने आशिया कपच्या एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 43 सामने खेळले, ज्यात त्यांनी 7 सामने जिंकले. त्याचवेळी अफगाणिस्तानने 9 सामने खेळले असून, त्यात 3 सामने जिंकले आहेत.

दोन्ही टीमचे असे आहे प्रदर्शन
अफगाणिस्तान संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 149 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 73 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, त्यांना 71 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले, तर 1 सामना बरोबरीत संपला आणि 4 सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर बांगलादेश संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 415 सामने खेळले आहेत.

यादरम्यान बांगलादेशने 152 सामने जिंकले, तर 254 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. बांगलादेश संघाचे 9 सामनेही रद्द झाले. आशिया चषक 2023 मध्ये, हे दोन्ही संघ श्रीलंकेसह ग्रुप-बीमध्ये आहेत. या गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 साठी पात्र ठरतील.

दरम्यान, आशिया चषक 2023 आजपासून सुरू होणार आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. या दोघांमधील हा सामना पाकिस्तानातील मुलतान येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *