Cm Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री बदलणार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर…

विरोधकांना राजकारण करु द्या, मी माझं काम करणार, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आरोप केला. या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवारांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडीत गावात पाहणीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून ‘सरकार पडणार..सरकार पडणार’ असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी अनेक ज्योतिषं पाहिली आहेत. मात्र, माझ्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे सरकार अधिक मजबूत झालं असून विरोधकांना राजकारण करु द्या, मी माझं काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्याचं कारण दाखवत मुख्यमंत्रिपदावर दुसऱ्याचीच वर्णी लागणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. या आरोपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच माझी तब्येत चांगली असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

तसेच ईर्शाळवाडी दुर्घटनेतील कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. या 42 कुटुंबांचं पुनर्वसनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या जागेची पाहणी केली आहे. सिडकोच्या माझ्यमातून 42 घरे बांधण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ईर्शाळवाडी दुर्घटनेतील कुटुबियांच्या पुनर्वसनासाठी जागेचा लेआऊट मंजूर करण्यात आला आहे. आता कुटुंबियांच्या मंजूरीनंतर घरांचा नकाशा मंजूर करण्यात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची घरे बांधण्यात येणार आहेत. तसचे महिला आणि पुरुष बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी निधीची व्यवस्था केली असून रोजगारीचाही प्रश्न मार्गी लावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ईर्शाळवाडी दुर्घटनेतील सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय भरतीत दरडग्रस्त म्हणून कसा रोजगार देता येईल, याबाबत सरकार अनूकूल असून विधवा महिलांना पेंशन, अनाथ बालकांना लाभासह श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने पालकत्व स्विकारल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *