400 सरपंच, 250 शेतकरी अन् मच्छिमार.., स्वातंत्र्य उत्सवात लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे असणार

लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिनाची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या स्वातंत्रदिनाला अवघे काही तासच उरले आहेत. या विशेष प्रसंगी देशातले 400 सरपंच, 250 शेतकरी आणि कामगार अशा एकूण 1800 विशेष पाहुण्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आमंत्रित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या ‘लोकसहभाग’ उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून विशेष पाहुण्यांना निमंत्रण देऊन सन्मान करण्यात आला आहे.

यामध्ये विशेषत: गावचे सरपंच, शेतकरी उत्पादक संस्थांशी निगडीत असलेले शेतकरी बांधव, पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि पंतप्रधान कौशल विकास योजनेचे लाभार्थी या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यदिनी सहभागी होणार आहेत. तसेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कर्मचारी, अमृत सरोवर प्रकल्प, हर घर जल योजना प्रकल्पांमध्ये मदत करणाऱ्या आणि काम करणाऱ्यांनाही त्यांच्या कुटुंबियांसह स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यासोबतच प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमारांचीही नावे यादीत आहेत.

विशेष काही पाहुण्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची भेट घेणार असून देशातल्या प्रत्येक राज्यातील 75 दाम्पत्यांना पारंपारिक पोशाखात दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांना सर्व अधिकृत आमंत्रणे निमंत्रण पोर्टलद्वारे (www.aaamantran.mod.gov.in) ऑनलाइन पाठविली गेली आहेत. या पोर्टलद्वारे 17,000 ई-निमंत्रण पत्रिक जारी करण्यात आली आहेत. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *