इंग्रजांना टक्कर देणारी ‘गरिबांची औषध कंपनी’ विकली जाणार; नेमकं प्रकरण काय?

Cipla : देशातील तिसरी सर्वात मोठी फार्मा कंपनी सिप्ला (The Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories) विकली जाणार आहे. 1.2 लाख कोटींची मार्केट कॅप असलेली ही कंपनी परदेशी कंपनीला विकली जाणार आहे. ब्लॅकस्टोन ही जगातील सर्वात मोठी इक्विटी फर्म ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

मनी कंट्रोलने दिलेल्या अहवालानुसार, ब्लॅकस्टोनने LP (लिमिटेड पार्टनर्स) सोबत Cipla मधील संपूर्ण प्रवर्तकांचे स्टेक विकत घेण्यासाठी नॉन-बाइंडिंग बोली लावली आहे. सिप्ला कंपनी अद्याप विकली गेलेली नाही, मात्र विक्री करण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सिप्ला ही कंपनी 1935 मध्ये द केमिकल इंडस्ट्रियल अॅण्ड फार्मासुटीकल लॅबोरेटरीज) या नावाने ख्वाजा अब्दुल हमीद यांनी सुरु केली होती. ते एक केमिस्ट आणि उद्योजक होते. त्यावेळी ख्वाजा हमीद जर्मनीमध्ये केमिस्ट म्हणून काम करत होते. पाश्चात्य औषध कंपन्या भारत आणि त्यासारख्या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांचा जास्त विचार करत नसायच्या.

सर्वसामान्य लोकांना तर औषधही मिळत नसायचे. तेव्हा ख्वाजा हमीद यांनी जर्मनीतून भारतामध्ये येऊन स्वदेशी औषध निर्माता कंपनी सुरु केली. विशेष म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरु ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेक दिग्गज मंडळी सिप्लाचे दिवाने झाले होते. ख्वाजा हमीद यांनी औष निर्मिती क्षेत्रातील परदेशी कंपन्यांच्या दबदब्याला आव्हान देत स्वदेशी आणि स्वस्त औषधांसाठी एक मोठी आस निर्माण केली होती.

कोरोनानंतर भारत जगातील औषधांची राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतामधील औषध कंपन्या सर्वसामान्यांसाठी औषधं बनवण्यावर भर देतात. भारतीय कंपन्या जेनेरिक औषधं बनवितात. जगातील गरीब लोकांना देखील विकत घेता येते. या जेनेरिक क्रांतीची सुरुवातही सिप्लापासूनच झाली आहे.

ख्वाजा अब्दुल हमीद यांच्यानंतर युसूफ ख्वाजा हमीद यांनी सिप्लाची धुरा सांभाळली. साधारणपणे 1972 मध्ये सिप्लाने हृदयविकारावरील उपचारासाठी Propranolol या औषधाचे जेनरिक व्हर्जन तयार केले. यानंतर औषधाचा शोध लावणाऱ्या इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने सिप्लाविरुद्ध खटला भरला.

त्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. युसूफ हमीद यांनी या संदर्भात पंतप्रधानांची भेट घेतली आणि फक्त एकच प्रश्न विचारला की, या औषधाचा शोध लावणाऱ्यांना आपल्या स्किनचा रंग पसंत नाही, म्हणून कोट्यवधी भारतीयांना हे जीव वाचविणारे औषध मिळू नये, त्यानंतर भारताने पेटंट कायद्यामध्येच बदल केला. त्यातूनच जेनेरिक अर्थात स्वस्त औषधाचा मार्ग मोकळा झाला. सध्या सिप्लाची धुरा युसूफ हमीद यांची भाची समीना यांच्या खांद्यावर आहे. या कुटुंबाकडे सिप्लाचे 33.47 टक्के भागीदारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार ख्वाजा हमीद यांचे कुटुंब त्यांच्याकडील 33.47 टक्क्यांची भागीदारी विकणार असल्याची विकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *