‘सोनियाजी, राहुल यांचं लग्न करा, मा का लाडला बिगड गया’; फ्लाइंग किसवरून चित्रा वाघांची टीका

Chitra wagh On Rahul Gandhi : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका कथित कृतीची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) ‘फ्लाइंग किस’चा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या कृतीविरोधात महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनीही राहुल गांधींवर टीका केली. त्यांनी राहुल यांना रोडरोमिओ संबोधून मा का लाडला बिगड गया, अशी टीका केली. (Chitra wagh On Rahul Gandhi over flaing kiss)

चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात त्या म्हणाल्या, संसदेच्या पवित्र भूमीवर राहुल गांधींनी फ्लाइंग किस केल्याची कृती ही निंदणीय आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने असं वर्तन करणं हे अशोभणीय आहे. चौकीदार चार आहे, या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना कोर्टात लिखित स्वरुपात माफी मागावी लागली होती. अलीकडेच मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी त्यांना परत मिळाली. मात्र राहुलजींची वृत्ती बदलली नाही.

चित्रा वाघ म्हणाल्या, आज संसदेत मणिपूरच्या महिलांना न्याय आणि आदर देण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर त्यांनी केलेली कृती महिला विरोधी आहे. कॉंग्रेस नेते महिलांच्या सन्मानाची गोष्ट केवळ आपल्या भाषणातच करतात. त्यांची वृत्ती महिला विरोधी आहे, हे आज दिसलं. असे रोडरोमिओ भारत जोडो यात्रा काढत आहेत. कॉंग्रेसचं नेतृत्व करत आहेत. देशातील सर्वोच्च पदावर बसण्याची स्वप्न पाहात आहेत. मात्र, जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असं वाघ म्हणाल्या.

यावेळी त्यांनी सोनिया गांधींना निवेदन केलं. त्या म्हणाल्या, सोनियाजी, लवकरात लवकर राहुल यांचं लग्न करा. त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. मा का लाडला बिगड गया, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *