लोकसभेत अरविंद सावंत-राणेंमध्ये खडाजंगी! मोदी-शाहांवर बोलले तर औकात दाखवू, राणेंची धमकी

Narayan Rane On Arvind Sawant : केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावर बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये लोकसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी एकमेकांची औकात काढण्याची भाषा केली. त्याचबरोबर हिंदुत्व, पळकुटे अशा विविध विषयांवरुन एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाला थेट धमकी दिली आहे, जर तुम्ही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर बोलाल तर तुमची औकात दाखवून देऊ अशी थेट दम दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचा जो आवाज आहे तो वाघाचा आवाज नाही, तो मांजरीचा बनला आहे. ते महाराष्ट्रातून संपले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, त्यांची औकात नाही असे म्हणत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी राणे म्हणाले की, खासदार अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना मला असे वाटले की, मी संसदेत नसून महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. हिंदुत्वाबद्दल बोलताना ज्यावेळी 2019 मध्ये भाजपबरोबर निवडणुका जिंकल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षासोबत सरकार केले त्यावेळी तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते? असाही सवाल राणे यांनी उपस्थित केला.

खासदार सावंत म्हणाले की, सरकारवर अविश्वास प्रस्ताव का आणला? हा अविश्वास प्रस्ताव फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणण्याचा विषय नाही तर मणिपूरमध्ये एवढा मोठा हिंसाचार झाला, महिलांवर अत्याचार झाला, मात्र केंद्र सरकार 70 दिवस शांत राहिले, त्यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. जर केंद्र सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली नसती तर हा विषय समोर आला नसता असाही आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.

खासदार सावंत म्हणाले की, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले त्यावेळी केंद्र सरकारचं तोंड 36 सेकंदासाठी उघडलं आणि त्यावर बोलले. हा त्या भागातील लोकांचा राग आहे. अशा विषयावर आपण जेव्हा राजकीय चर्चा करतो तेव्हा महाराष्ट्रातील विषयावर बोललं जातं, त्यावरही आज आम्ही बोलणार आहोत, काही जण आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आम्ही जन्मानेच हिंदू आहोत, आणि ते आम्हाला हिंदुत्व शिकवतात. हिंदू पळकुटे नसतात, जे पळकुटे आहेत ते काय बोलणार? असं म्हणत शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय कळणार? बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, मला मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू नको, मला आतंकवाद्यांना मारणारा हिंदू पाहिजे, ही विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांची होती. आज खोटे लोकं खोटं बोलून खरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, तेच चार दिवसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सहभागी झाले, फक्त सहभागी झाले नाही तर मंत्रिदेखील बनले, मग याला काय म्हणायचं? की आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत? ईडीची भीती दाखवून घेऊन गेले, असाही आरोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *