मंत्रालय मारहाण प्रकरण बच्चू कडूंच्या अंगलट? अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा दिला जबाब

मंत्रालय मारहाण प्रकरणी आमदार बच्चू कडूंच्या(Bacchu Kadu) अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयात मारहाण प्रकरणी साक्षीदारांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली असून या प्रकरणी मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. तसेच पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश बच्चू कडूंना देण्यात आले आहेत.

साक्षीदारांसह अधिकाऱ्यांची तपासणी सुरु असताना बच्चू कडू यांनी मारहाण केल्याचं त्यांनी जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीला खुद्द बच्चू कडू यांना हजर रहावं लागणार आहे. त्याबाबतचे निर्देश मुंबई न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

नेमंक प्रकरण काय?
2018 साली एका पोर्टसंबंधी प्रकरणात बच्चू कडू यांनी मंत्रालयातील कर्मचारी पी. प्रदीप यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. बच्चू कडू प्रदीप यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर या भेटीदरम्यान त्यांनी कर्मचाऱ्याचा लॅपटॉप उचलून अंगावर उगारल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही केलं होतं. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कडू यांच्यावर 353, 504, 506 नूसार गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी सुनावणी सुरु असताना कडू यांनी सुनावणीला हजर राहण्यामध्ये दिरंगाई केली होती. वारंवार समन्स बजावूनही बच्चू कडू कधीही सुनावणीला हजर राहीले नाहीत. त्यामुळे न्यायालयानं अखेर या प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. सुनावणीदरम्यान बच्चू कडू स्वतः अखेर कोर्टापुढे हजर झाले, आणि त्यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. अखेर त्यावेळी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. त्यानंतर आता सुनावणीमध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच पुढील सुनावणीला कडू यांनी हजर राहण्याबाबत सांगितलं आहे. साक्षादारांच्या जबाबानंतर आता अंतिम सुनावणीदरम्यान कडू यांना शिक्षाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *