भाजपला धक्का! ‘या’ खासदारला दोन वर्षांचा तुरुंगवास; खासदारकी जाणार?

BJP News : सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर भाजपला धक्का देणारी आणखी एक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राम शंकर कठेरिया यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

टोरेंट पॉवर कार्यालयाची तोडफोड तसेच अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी आग्रा येथील खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष दंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर आता कठेरिया यांची खासदारकी रद्द होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत इंडिया टुडेनं वृत्त दिले आहे.

कठेरिया यांनी 2011 साली आग्रा येथील टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथे तोडफोड केल्या प्रकरणी 16 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या कंपनीच्या व्यवस्थापकाने त्यावेळी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार डॉ. कठेरिया व त्यांच्या सोबत असलेले 15 कार्यकर्ते कार्यालयात शिरले. व्यवस्थापकाला मारहाण व कार्यालयाची नासधूस केल्याचाही आरोप आहे. आग्रा येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. शनिवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. त्यानंतर कोर्टाने कठेरिया यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

या शिक्षेवर कठेरिया यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी आज नेहमीप्रमाणे न्यायालयात हजर झालो. न्यायालयाने माझ्याविरोधात निर्णय दिला. मी न्यायालयाचा पूर्ण आदर करतो. मला अपील करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा मी वापर करणार आहे. कठेरिया हे उत्तर प्रदेशातील इटावा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 147 (दंगल) आणि 323 (दुखापत करणे) अंतर्गत दोषी ठरवले आहे. कठेरिया यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि एससी-एसटी आयोगाच्या अध्यक्षपदी काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *