China : बिजींगमध्ये पावसाचा कहर; 20 जणांचा मृत्यू; मेट्रो-रेल्वे बंद, विमानांची 400 उड्डाणं रद्द

China Rain Update : अनेक दिवसांपासून चीनच्या विविध भागात मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. ज्या भागात मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे, त्या भागांमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे चीनची राजधानी बीजिंग आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पुरामुळे आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासह 27 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

बीजिंगमध्ये शनिवार ते सोमवारपर्यंत 260 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे राजधानीतील रेल्वे स्टेशन बंद ठेवण्याची वेळ ओढवली. त्याचबरोबर हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात खराबी आल्यामुळे जवळपास 400 हून अधिक हवाई उड्डाणं रद्द करण्यात आली.

बीजींगसह शेजारच्या काही जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे त्या-त्या भागातील मेट्रोमार्ग मंगळवारपासून बंद ठेवण्यात आला आहे. सोमवारी रात्रीपासून 100 हून अधिक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुरामध्ये अडकलेल्या 52 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बीजिंगसाठी यंदा पर्जन्यमानाची पातळी असामान्य आहे. 2012 नंतरचा सर्वाधिक पाऊस यंदा जुलैमध्ये झाल्याची माहिती पावसाच्या आकडेवारीवरुन समोर आली आहे.

बीजिंग आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात बचावकार्यासाठी बोटींची मदत घ्यावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *