देसाईंचं फक्त चार मिनिटांचं प्रेझेन्टेशन अन् PM मोदीही भारावले; ‘तो’ किस्सा वाचाच!

Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज त्यांच्या स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. देसाई यांची ही अकाली एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याची उत्तरे आता शोधली जात आहेत. मात्र त्यांचा कला दिग्दर्शन क्षेत्रातील प्रवास अद्भूत होता. खुद्द नरेंद्र मोदींनीच (PM Modi) त्यांना एक खास ऑफर दिल्याचा किस्सा आता चर्चिला जात आहे.

नितीन देसाई यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. देसाई यांनी सन 2003 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी कमळाचा भव्य स्टेज तयार केला होता. हा स्टेज 80 फूट लांब होता. भाजप नेते विनोद तावडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मोदी पंतप्रधान नव्हते. या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात मोदी यांनी देसाई यांच्या कार्यकुशलतेचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, यातील एक लाख लोक मला ऐकण्यासाठी आले आहेत, बाकीचे दीड लाख लोक माझे मित्र नितीन देसाई यांनी तयार केलेला स्टेज पाहण्यासाठी आले आहेत.

हा कार्यक्रम झाल्यानंतर मात्र माझी आणि मोदींची भेट काही झाली नाही. दोन दिवसांनी मात्र मोदींचाच फोन आला. नरेंद्र मोदी का नितीन देसाई का प्रणाम, तु्म्ही जे माझ्यासाठी केलं आहे याबाबत मी दोन दिवस विचार करत आहे. तुमच्याशी भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला भेटायला वेळ आहे का, असे मोदी म्हणाल्याचे देसाई यांनी या मुलाखतीत सांगितले.

मी पाचशे एकर जमीन देतो पण, स्टुडिओ गुजरातमध्येच बनवा

यानंतर मोदी आणि देसाई यांची मुंबईतील विलेपार्ले येथे भेट झाली. मोदींनी विचारलं तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे. त्यावर मोदींना चार मिनिटांचं प्रेझेन्टेशन दिलं. ते पाहून मोदी भारावून गेले. ते म्हणाले, महाराष्ट्र जिथे संपतो आणि राजस्थान जिथे सुरू होतो त्याच्यामधला सगळा गुजरात तुमचा आहे. मी तुम्हाला पाचशे एकर जमीन देतो, तुम्हाला जो स्टुडिओ बनवायचा आहे तो गुजरातमध्ये बनवा, अशी खास ऑफर मोदींनी दिल्याचे देसाई यांनी या मुलाखतीत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *