भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरी वनडे; दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर टीम इंडिया आज मालिका विजयासाठी मैदानात उतरेल. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दुसऱ्या सामन्यात केलेला प्रयोग टीमच्या चांगलाच अंगलट आला होता. त्यामुळे तिसर्‍या वनडेत रोहित आणि विराट पुनरागमन करतील हे निश्चित आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघासाठी आजचा सामना ‘करो या मरो’च्या स्थितीत असणार आहे.

टीम इंडियाने 2006 पासून विंडीजमध्ये एकही मालिका गमावलेली नाही, तर यजमान कॅरेबियन संघाला दीर्घकाळ चाललेला एकदिवसीय मालिका विजयाचा दुष्काळ संपवायचा आहे. पहिली वनडे हरल्यानंतर विंडीजने जबरदस्त पुनरागमन करत दुसरी वनडे जिंकली. या विजयाने कॅरेबियन संघाचे मनोबल उंचावले असून मालिका विजयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

भारताने पहिला एकदिवसीय सामना 5 गडी राखून जिंकला तर दुसऱ्या वनडेत विंडीजने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला संपूर्ण 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही. दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव झाला असला तरी दुसऱ्या वनडेत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात नव्हते. तिसर्‍या वनडेत रोहित आणि विराट पुनरागमन करतील, यामुळे टीम इंडिया आणखी मजबूत होईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जाणारा हा शेवटचा आणि निर्णायक सामना कोण जिंकणार याची क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डनुसार भारतीय संघाचा वेस्ट इंडिजविरुद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. या दौऱ्यात भारताने वेस्ट इंडिजचा कसोटी मालिकेत पराभव केला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडेचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *