‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड

Sanjay Raut on Manipur Violence : मणिपूर येथील तीन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार त्यानंतर महिलांवरील अत्याचाराचा व्हायरल झालेला व्हिडिओ यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपुरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या खासदारांचाही समावेश आहे. या घडामोडींनंतर आज संजय राऊत यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकावर तोफ डागली आहे.

या देशातील जनतेची दुःखे जाणून घेण्याला पंतप्रधान शो ऑफ म्हणत असतील तर इतकं क्रूर सरकार आणि राजकारण आम्ही पाहिलेलं नाही. राजधानी इंफाळ शहरात कालही मोठे मोर्चे निघाले होते. देशभरात जिथे कुठे आदिवासी समाज आहे तिथेही मोर्चे निघत आहेत. काल महाराष्ट्रातही तीन ठिकाणी आदिवासी समाजाने मोर्चे काढले. मणिपूर हिंसाचाराबाबत भाजप अभद्र भाषेचा वापर करत आहे मला वाटतं हा संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

काल उद्धव ठाकरेय यांनी ठाण्यात हिंदी भाषकांचा मेळावा घेतला. त्यावर शिंदे गट आणि भाजपने टीका केली. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरुनही ठाकरे गटाला घेरले. त्यावर आज राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले. दिघे साहेबांच्या अंत्यदर्शनाला कोण कोण उपस्थित होतं हे आम्हाला माहित आहे. तेव्हाचे व्हिडिओ मिळाले तर पाहा. दिघे साहेबांचं नाव गद्दारांसोबत जोडू नका. हा दिघे साहेबांचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना फटकारलं.

.. तर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल – बावनकुळे

या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे प्रत्यक्ष कृतीत मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर 2024 नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल’, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *