अतुल लोंढेंनी केसरकरांची इज्जतच काढली म्हणाले, देश कसा चालवायचा काँग्रेसला…

Atul Londhe On Deepak Kesarkar : काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे विधान बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही त्याचसोबत एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवत येत नाही, हे जनतेला समजले आहे. काँग्रेसने 60 वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील व विविध राज्यात सरकार चालवली आहेत, त्यामुळे देश कसा चालवायचा, हे केसरकरसारख्यांनी काँग्रेसला शिकवू नये, असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

अतुल लोंढे यांनी दीपक कसरकरांनी केलेल्या टीकेला खरमरीत उत्तर दिले आहे. लोंढे म्हणाले की, केसरकर आपण शिक्षणमंत्री असूनही किती अशिक्षित आहेत? हे त्यांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिले आहे.

कर्नाटकमध्ये सत्ताबदल होऊन 55 दिवस झाले तरी अजूनही भाजपला विरोधी पक्षनेता निवडता आलेला नाही, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे? महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडून गद्दारांचे सरकार आल्यानंतर 40 दिवस या सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही.

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला एक वर्ष झाले तरी अद्यापही राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री नेमता आले नाहीत. एका-एका मंत्र्यांकडे सहा-सहा जिल्ह्यांचा प्रभार आहे. शिंदे गटाला महाराष्ट्र चालवता येत नाही आणि नरेंद्र मोदींना देश चालवता येत नाही, हे जनतेने पुरते ओळखले आहे, त्यामुळे मनातल्या भितीमुळे केसरकरांचे शब्द बाहेर आले आहेत, असे लोंढे म्हणाले.

अतुल लोंढे म्हणाले की, कॉंग्रेसने 60 वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील आणि विविध राज्यांमध्ये सरकार चालवले आहे. त्यामुळे देश कसा चालवला पाहिजे किंवा कसा चालवायचा हे दीपक केसरकरांसाख्यांनी कॉंग्रेसला शिकवू नये असेही यावेळी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *