Nana Patole :आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूला सरकारच जबाबदार; सरकारची मस्ती जनता उतरवेल

मुंबई : रस्ता नसल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू (igatpuri woman death) झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात घडली आहे. इगतपुरीसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात विकासाच्या वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणेच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना बसत आहे. दरम्यान, याच घटनेमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सरकारवर ताशेरे ओढले. आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केला. (nana patole on bjp says government is responsible for igatpuri woman death)

यासंदर्भात बोलतांना पटोले म्हणाले की, राज्यातील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले असतांनाही रस्त्यांवर केवळ खड्डेच खड्डे आहेत, तर दुसरीकडे गावे आणि आदिवासी भागात रस्ते नाहीत. इगतपुरी येथील एका आदिवासी गर्भवती महिलेचा रस्त्याअभावी मृत्यू झाला, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. आदिवासी गर्भवती महिलेचा हा मृत्यू नसून एकप्रकारची हत्या आहे. सरकारी असंवेदनशीलतेचा प्रकार आहे. आदिवासी गरोदर महिलांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे.

Inside Story : मोदी सरकार संपूर्ण बहुमतात… तरीही विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा अट्टाहास का?

पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने विधानसभेत इगतपुरी प्रश्नावर नियम ५७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. सर्व कामे बाजूला ठेवून चर्चा व्हावी, अशी काँग्रेसची मागणी होती. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू होणे ही घटना भूषणावह नाही. आदिवासी आहेत म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे पण भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मूठभर लोकांसाठी सोईसुविधा आहेत. गरीब, आदिवासी, गाव-खेड्यातील लोकांसाठी कोणतीही सोय नाही. भाजप सरकारमध्ये आदिवासी व मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. सरकार मस्तीत वागत आहे, पण सरकारची ही मस्ती जनता उतरवेल.

सरकारने काल ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. हा पैसा सरकार कुठून आणणार आहे, सरकार जनतेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढवत आहे. सरकार रस्त्यांवर खर्च करते पण जिथे रस्त्यांची गरज आहे तिथे रस्ते का नाहीत? रस्त्याअभावी इगतपुरीच्या आदिवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांकडे सातत्याने पाठ फिरवत आहे, असं पटोले म्हणाले.

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपने 2014 मध्ये देशातील आणि राज्यातील रस्ते टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अजूनही रस्ते टोलमुक्त केले नाहीत. भाजपची सत्ता येताच टोलमध्ये वाढ करण्यात आली, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले. रस्ते विकासाच्या नावाखाली कर आणि टोल वसूल करतात, ही जनतेची दुहेरी लूट आहे. ज्यांनी टोल बंदी केली तेच आता टोलचे समर्थन करत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *