यवतमाळमध्ये आभाळ फाटलं! पुरात दोघांचा मृत्यू, 45 जण पुरात अडकले; मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर बोलवले

राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे त्या गावांमधील गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. जिल्ह्यामधील सर्वच मार्गांवर पुराचे पाणी असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.

पावसाचा जोर वाढल्यानं आनंदनगर तांडा येथे 45 जण पुरात अडकले आहेत. तर घरांच्या भिंती कोसळून दोघांचा त्यात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी राज्य शासनाने हवाई दलाकडून दोन हेलिकॉप्टर्स मागवले आहेत. त्यामुळे आता हवाईदलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य केले जाणार आहे.

यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुराचा फटका जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. या पुरात अनेकजण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर महागाव तालुक्यातील आनंदनगर येथील नागरिक पुरात अडकले आहेत, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

पैनगंगा नदीचे पाणी आनंदनगरमध्ये शिरल्यामुळे संपूर्ण गावालाच नदीचं स्वरुप आलं आहे. प्रत्येक रस्त्यावर चार ते पाच फुटावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. या पुरात आतापर्यंत अनेकांची घरं वाहून गेली आहेत. बचाव पथकांकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सज्ज आहेत. त्याचवेळी पावसाचा जोर वाढल्यामुळे बचावकार्यात अडचणी देखील येत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले आहे. यावर फडणवीस यांनी सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *