भाजपचा मास्टरस्ट्रोक! निवडणुकीआधीच आणखी दोन पक्षांची NDA मध्ये होणार एन्ट्री

NDA vs INDIA : लोकसभा निवडणुकांच्या तयारीत असलेला भाजप विरोधकांच्या सध्याचा राजकारणाला झटका देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी भाजपाने एनडीए मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपाने आपले दुरावलेले मित्र पुन्हा जवळ घेण्याबरोबरच नवीन मित्रांचा शोध सुरू केला आहे. भाजपला गुडन्यूज दक्षिणेतील कर्नाटक राज्यातून मिळाली आहे. येथे जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी भाजपबरोबर युती करण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता उत्तर भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून आणखी दोन पक्ष एनडीएत सहभागी होण्याची शक्यता आहे.

भाजप सध्या बिहारमध्ये मुकेश सहन यांच्या विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) आणि उत्तर प्रदेशातील महान दल या पक्षांबरोबर सुरू आहे. तसे पाहिले तर उत्तर प्रदेशात भाजपाकडे मतांची टक्केवारी जास्त आहे. बिहारमध्येही पक्षाची स्थिती चांगली आहे. तरीदेखील भाजप लहान पक्षांना सोबत घेऊन आघाडी मजबूत करण्याचा विचार करत आहे.

सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) 38 पक्ष सहभागी आहेत. मात्र यामध्ये असेही काही पक्ष आहेत ज्यांनी आतापर्यंत लोकसभेची एकही जागा जिंकलेली नाही. दहा पक्ष असे आहेत ज्यांनी मागील लोकसभा निवडणूक लढली नव्हती. तर 15 पक्ष असे आहेत ज्यांनी एकही जागा जिंकली नाही.

26 विरोधी पक्षांनी ज्यावेळी संयुक्त आघाडीची घोषणा केली त्यानंतर एनडीएनेही विस्तार करण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या बैठकीनंतर एनडीएचीही दिल्लीत मोठी बैठक पार पडली. राजकीय जाणकारांच्या मते, लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील विरोधी पक्ष एकत्र आल्याने भाजपलाही एनडीए आघाडी बळकट करण्याची गरज वाटू लागली आहे. भाजप नेतृत्वाला असा विश्वास वाटत आहे की ज्या पद्धतीने एनडीएचा विस्तार झाला त्यानुसार मतांची टक्केवारी सुद्धा वाढेल. शिरोमणी अकाली दल आणि तेलुगू देसम पार्टी पुन्हा एनडीएत येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, यावर अद्याप काही ठोस निर्णय झालेला नाही.

सुरुवातीलाच दोन गुडन्यूज

स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हनुमान म्हणवून घेणारे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास पासवान) नेते चिराग पासवान यांनी दोन दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच दक्षिणेतील मोठे राज्य कर्नाटकमधून भाजपसाठी दुसरी गुडन्यूज आली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही कर्नाटकात भाजपबरोबर युती करणार असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *