उद्धव साहेब अन् मी भोळे; आम्हाला राजकारण कळत नाही : आदित्य ठाकरे

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज शहरातील सातपूर परिसरात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा घेण्यात आला यावेळी आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर सध्याच्या राजकीय घडमोडींवरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर राज्यातील उद्योग बाहेर गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड आहे आपण मात्र तरीही लढत आहोत. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र पुढे जात होता, आज कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्नही यावेळी आदित्य ठाकरेंनी विचारला, त्याचवेळी उद्धवसाहेब आणि आम्ही भोळे आहोत, आम्हाला राजकारण कळत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे भाषण सुरु होण्याआधीच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ते म्हणाले की, खोके सरकार फक्त घोषणांचे सरकार आहे. घोषणा दिल्या की, घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असेच वाटते. सध्या साफ आणि स्वच्छ विरुद्ध गद्दारी असे राजकारण सुरु आहे. जगात महाराष्ट्राचं नाव होतं, तो महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? राजकारणाची दलदल झाली असून आता कोण कोणाचे होर्डिंग्ज लावतो, कोण कोणाचे फोटो लावतो तेच समजत नाही.

आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण आहे? आम्हाला फोडाफोडीचं राजकारण जमत नाही, आम्ही जनतेचा आवाज ऐकतो, असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

आजच्या घडीला आपण एकत्र येण्याची गरज आहे, कारण दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्राला तोडण्याचे काम सुरु आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्राला झुकवण्याचे काम सुरु आहे. आज देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत. प्रत्येक आठवड्यातले दोन दिवस मुख्यमंत्री दिल्लीला असतात.

अनेक राजकीय पक्ष फोडाफोडीत व्यस्थ आहेत, त्यामुळे अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये देखील झाला नाही, याचं नुकसान आपल्या देशाला झालं. मी हमखास सांगतो, गेलेले सगळे उद्योग महाराष्ट्रात राहिले असते. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते.

लाखो तरुण तरुणी रोजगाराच्या संधीसाठी फिरत आहेत. आपल्या राज्यात प्रकल्प नसल्याने तरुणांना नोकरी नाही, शेतकऱ्यांचा, तरुणांचा आवाज ऐकणारे कोणी नाही, महाराष्ट्राला पुढे येऊ द्यायचं नाही, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *